नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.
कोरोना संकटकाळात विरोधकांची अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीवर तपशीलवार चर्चा होईल. आज दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमकेसह देशातल्या 22 पक्षांचा या बैठकीत सहभाग असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, डीएमके नेता स्टालिन, लोकतंत्रिक जनता दलाचे नेता शरद यादव, आरजेडी नेता तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत.