ठाणे – देशात एकीकडे करोना संसर्ग थैमान घालत आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या स्थितीतही वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना बर करत आहेत. त्यातच म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. करोनाबाधिताला या आजाराची भीती आहे. या आजाराचा आधार घेत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
पुण्यात करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी विरोधकांना ब्लॅक फंगसची उपमा दिली. करोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात, असं राऊत म्हणाले.
दरम्यान शिवसैनिकांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.
येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी विशेष बालकक्ष आहे. यामध्ये ४० खाटा बालक आणि त्यांच्या पालकांसाठी असलेल्या सेंटरचे उद्घाटन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले.