मुंबई – राज्यात करोनाचे संकट असताना आता म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा प्रसार हवेतून होतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यासंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डाॅ. तात्याराव लाहने म्हणाले, म्युकरमायकोसिस हा आजार म्युकरमुळे होतो. म्युकर हा जमिनीत असतो आणि तो हवेत येऊ शकतो. मात्र आपल्या शरीरात हा हवेतून जातो असे म्हणता येणार नाही, असे डाॅ. लहाने यांनी सागितले आहे.
तसेच हा आजार संसर्गजन्य नसून एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होत नाही, असेही डाॅ. लहाने यांनी सागितले. राज्यात आता म्युकरमायकोसिस आजाराचे जवळपास 800 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्याकडे राज्यात या आजारावर उपचारासाठी 110 रुग्णालये आहेत. या आजारावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनचे उत्पादन कमी होते कारण तेवढी आधी गरज नव्हती.
मात्र, मॅन्युफेक्चरींग कमी आणि रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे अडचण जाणवत असल्याचे डाॅ. लहाने यांनी सांगितले. पुढे बोलताना डाॅ. लहाने म्हणाले, सर्व मेडिकल काॅलेजमध्ये म्युकरसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरु केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिसचा समावेश केला आहे.
त्यामुळे या आजारासाठी दीड लाख खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. पण ज्यांना पाच लाखापुढे खर्च लागतोय त्यांना महाराष्ट्र शासनाकडून शासकीय मदत म्हणून दिली जाणार आहे. करोना व्हायरस म्युटेशन जे झाले आहे त्यामुळे हा आजार समोर येत असल्याचेही डाॅ. लहाने यांनी सांगितले.