दिवसा उघडीप अन्‌ रात्री तडाखा

मुसळधार पावसामुळे नद्यांसह धरणांच्या पाणीपातळीत होतेयं वाढ

पूल पाण्याखाली, दरड-झाडे रस्त्यावर

पावसाचा जोर वाढल्याने नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम भागात नदी, ओढ्यांवर स्थानिकांच्या दळणवळणासाठी बांधण्यात आलेले कमी उंचीचे पूल जोरदार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याकडेला असलेली झाडेदेखील उन्मळून रस्त्यावर पडत असल्याने वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे.

सातारा – गत आठ-दहा दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून दिवसा पाऊस उघडीप देत असला तरी रात्रीच्या चांगलाच तडाखा देत आहे.

40 ते 42 अंशाचा पारा झेलून असहाय्य झालेले जिल्हावासिय उशिरा का होईना पण सुरु झालेल्या पावसामुळे सुखावले आहेत. जून महिना संपत आला तरी आकाशात पावसाचे ढग जमत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच मनात चिंतचे ढग जमा झाले होते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात पडणाऱ्या अवकाळी पावसानेदेखील पाठ फिरवल्याने पाऊस येणार का? आणि आला तरी तो कितीप्रमाणात पडणार अशी हुरहुर लागून राहिलेली असतानाच जुनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पावसाला आठ-दहा दिवस सुरु झाले असून अखंडपणे सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रात्रंनदिवस संततधार सुरु असल्याने कोयना, धोम, उरमोडी, तारळी यासह इतर धरणांमध्येही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या कोयना धरणाने 25 टीएमसीचा आकडा गाठला असला तरी तो कधी शंभरीवर जाणार याची अपेक्षा जिल्हावासियांना आहेच.

चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडू लागल्या आहेत. लहानमोठे ओढे नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. याशिवाय नद्यांवर असलेले कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेल्याने गावे संपर्कहीन होऊ लागली आहेत. कास, ठोसेघर, पाचगणी, महाबळेश्‍वर, प्रतापगड यासह डोंगरपरिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. शनिवार आणि रविवारी पावसाने दिवसा चांगली उघडीप दिली होती. मात्र रात्रभर तडाखा दिला. तसेच सोमवारी सकाळीदेखील पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु, दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.