पुणे मेट्रो : भूमिगत कामाच्या “रिंग सेगमेंट’चे काम सुरू

 6 किलोमीटर मार्गावर 6 हजार रिंग बसवणार

पुणे – पुणे मेट्रोच्या भूमिगत कामाच्या “रिंग सेगमेंट’च्या निर्मितीचे काम सोमवारी सुरू झाले. येरवडा कॅम्पसच्या डेक्‍कन कॉलेज परिसर येथे बनविलेल्या कास्टिंग यार्डमध्ये या कामाला प्रारंभ झाला. पुणे मेट्रोच्या 6 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 6 हजार रिंग बसवले जातील. एका रिंगमध्ये 6 सेगमेंट बसवण्यात येणार असल्याची माहिती “महामेट्रो’चे व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली. यावेळी प्रकल्प समन्वयक आणि टाटा-गुलरमॅक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डेक्‍कन कॉलेज आवारातील 50,000 चौ. मीटरच्या परिसरामध्ये 1 कास्टिंगगार्ड तयार करण्यात आले आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी टाटा-गुलरमॅक कंपनीने ते भाड्याने घेतले आहे. येथे सुमारे 6 हजार रिंग म्हणजेच 36 हजार सेगमेंट तयार केले जातील. यासाठी कंपनीने अत्याधुनिक सुविधा निर्माण केली आहे. सेगमेंट बनवण्याचा साचा कोरियावरून मागवण्यात आला आहे.

सगळे भूमिगत स्टेशन फायनल
भूमिगत मेट्रोमध्ये 5 स्टेशन्स बनवण्यात येणार आहे. हे सगळ्या स्टेशनच्या जागा अंतिम केल्या आहेत. शिवाजीनगर परिसरात एसटी स्थानकाच्या जागेवरच मेट्रो स्टेशन होणार आहे. वर एसटी स्थानक आणि त्या खाली मेट्रो स्टेशन बनवण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकासाठी एकूण 3300 चौ. मीटर जागा मिळाली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या समोर गोडावून परिसरात इंटरचेंज मेट्रो स्टेशन बनवण्यात येणार आहे. येथे पिंपरी-स्वारगेट तसेच वनाज ते रामवाडी रूटवरील मेट्रो क्रॉस होणार आहेत. फडके हौद चौक परिसरात नागरिकांनी मेट्रो स्टेशनला विरोध केला होता. मात्र, आता तेथील महापालिकेच्या दादोजी कोंडदेव शाळेमध्ये हे स्टेशन होणार आहे. कसबा पेठ स्टेशन आणि मंडई स्टेशन हे “न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ (एनएटीएम) प्रमाणे बनवण्यात येणार आहेत. स्वारगेट टर्मिनलसाठी 28 हजार चौ.मी. जागा मिळाली आहे. येथे मेट्रो स्थानकासह मल्टी मॉडेल हबही बनवण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.