विधानसभेसाठी रावतेंकडून व्यूहरचना

कार्यकर्त्यांकडून घेतला आढावा

कराड  – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहावर सातारा व सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या दोन्ही जिल्ह्यातून शिवसेनेच्या जागा वाढवण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी सातारा जिल्ह्यातील सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार यांच्यासह पुरुषोत्तम जाधव, रामभाऊ रैनाक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेनेने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपप्रमाणे शिवसेनाही स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. तालुकास्तरापर्यंत नेते जाऊन पोहोचले आहेत. त्यानुसार दिवाकर रावते यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गाव तेथे शिवसेनेची शाखा काढण्याबाबत सूचनाही केल्या.

प्रथम दोन्ही जिल्ह्याच्या प्रमुखांशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर या जिल्ह्यातील मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, तेथील राजकीय स्थितीची माहिती घेतली. पाटण आणि खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. दोन्ही जिल्ह्यातून सध्या दोन आमदार असून किमान ही संख्या आठवर जावी, असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच शिवसेनेचे “माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ हे अभियान राबवण्याच्या सूचना देत प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर शाखाप्रमुखांच्या नियुक्‍त्या करण्याचे आदेश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद चांगली आहे. तेथे सक्षम उमेदवार उभा करून निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचा आदेशही त्यांनी यावेळी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.