“राम राज्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच लोकांना रामभरोसे सोडले”; नवाब मलिक यांची सरकारवर सडकून टीका

मुंबई: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोज हजारोने लोक मरत आहेत. रुग्णसंख्या काही केल्या कमी होत नाही. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, आता इथे एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे अंत्यसंस्कारासाठी जागा देखील मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारच्या बक्सरमध्ये नदीच्या घाटावर मृत्यूदेहांचा खच आढळून आला होता. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकांवर अंत्यसंस्कार करायला लाकडे देखील शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जात आहेत, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी गंगा नदीत मृतदेहांचा खच पडल्याच्या सोशल मीडियावरील व्हीडिओसंदर्भात भाष्य केले. माझं मूळ गाव उत्तर भारतात आहे. तेथील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोणत्याही व्यक्तीची कोरोना चाचणी होत नाही. त्याठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत. एवढंच काय मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही शिल्लक राहिलेली नाहीत. अशी परिस्थिती असताना योगी सरकार टीव्हीवर जाहिराती करत आहे. उत्तर प्रदेशात लोकांना रामराज्य आल्याचे स्वप्न दाखवण्यात आले मात्र सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात नाहीत. कोणालाही उपचारापासून वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. भाजपशासित राज्यात मात्र चित्र वेगळे आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले. महाराष्ट्राला बिल्लारीमधून येणारा ऑक्सिजन बंद करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ऑक्सिजन गोव्याला देणे योग्य नाही. हे सर्व महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यासाठी सुरु आहे. योगी सरकार म्हणते आम्ही फक्त स्थानिक लोकांनाच लस देणार. केंद्र सरकार याबाबत काय विचार करत आहे? देशात एकच पद्धत असली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला लाजिरवाणी घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडली असून, यातून कोरोनाचं विदारक चित्र समोर आलंय. चौसा येथील महादेव घाटावर मृतदेहांचा खच पडलाय. उत्तर प्रदेशातील मृतदेह येथे आणले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलीय. कोरोना काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटावरची छायाचित्रानं सगळेच हादरलेत. या मृतदेहांनी गंगेचा महादेव घाटच भरलाय. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर येताच जिल्हा प्रशासनाचे हात वर केलेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.