पुणे – जगातील सर्वात मोठी लस उत्पादक असलेल्या “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ बरोबर सरकारचा करार होण्याची शक्यता असून ही लस 250 रुपयांत मिळण्याची शक्यता असल्याचे सीरमकडून स्पष्ट करण्यात आले.
ही लस देण्यासाठी आपत्कालिन परवानगीचा पहिला अर्ज “सीरम’नेच दाखल केला होता. त्यामुळे सीरमलाच परवानगी मिळू शकेल, असा विश्वासही सीरम व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
“सीरम इन्स्टिट्यूटचे’मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधीच जाहीर केले होते की, या लसीचे बाजारमूल्य प्रत्येकी एक हजार रुपये असू शकेल. परंतु, सरकार ही लस मोठ्या प्रमाणात खरेदी करून अतिशय कमी किंमतीत त्याचे वितरण करू शकते. तसेच, ही लस इतर देशांपेक्षा आधी भारतीयांना देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत 9.70 दशलक्ष नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेनंतर जास्त रुग्णसंख्या असणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फायझर आणि ऍस्ट्रॅजेनेका यांनी तयार केलेल्या लसींना अन्य देशांमध्ये आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय संशोधन मंडळाने आणि भारतीय आरोग्य मंत्रालयाने लसीच्या वापराबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.