पुणे – करोना काळात बायोमेडिकल वेस्ट संकलनासाठी पालिकेने कंपनी नेमली. पण, त्यांना वाढीव दराने पैसे देण्यास शहरातील खासगी हॉस्पिटल्सने नकार दिला. त्यामुळे कंपनीची तब्बल 7 कोटींची बिले थकली आहेत. हा वाढीव खर्च हॉस्पिटल्सने तातडीने द्यावा, अशा सूचना पालिकेने केल्या आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यावेळी उपस्थित होत्या.
शहरातील बायोमेडिकल वेस्ट संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पास्को या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी वेस्ट संकलन करून त्यावर प्रक्रिया करते. त्यासाठी प्रतिकिलो 47 रुपये दर ठरवण्यात आला. मात्र, करोनाकाळात केंद्राने या वेस्टसह, जेवणाच्या प्लेट, रुग्णांचे शिल्लक अन्न यांचाही समावेश या वेस्टमध्ये केला. तसेच पीपीई किटसह इतर साधनांचा वापर वाढल्याने शहरात दिवसाला 10 टन वेस्ट संकलित होत होते. त्यामुळे वाढलेले काम आणि करोनाकाळात कर्मचारी नसल्याने कंपनीवर ताण येत होता. या धर्तीवर कंपनीने प्रतिकिलो 100 रुपये संकलन दर देण्याची मागणी केली.
त्यानुसार पालिकेने हे दर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी कंपनीचा पुण्यातील प्रकल्प जेवणाच्या ओल्या कचऱ्यामुळे बंद पडल्याने कंपनीस शहरातील कचरा तळेजा येथील प्रकल्पात न्यावा लागला. त्यासाठी वाढीव खर्चाचा भुर्दंडही उचलावा लागला. त्यामुळे पूर्वप्रभावाने करोना काळातील बायोवेस्ट दराने पैसे देण्याची मागणी कंपनीने केली. कंपनीची भूमिका रास्त असल्याने पालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना 100 रुपये दराने पैसे देण्याचे आदेश दिले. मात्र, खासगी हॉस्पिटल्स पैसे देत नसल्याने अखेर पालिकेने सर्व हॉस्पिटल्सच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघडणी केली.
रुग्णांकडून उकळले 700 ते 1200 रूपये
महापालिकेने बायोवेस्टसाठी वाढवलेला दर जादा असल्याचा कांगावा करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सने रुग्णांकडून मात्र बायोमेडिकल वेस्टपोटी दररोज 700 ते 1200 रुपये शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. करोना उपचारांत दीड लाखांपेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या हॉस्पिटल्सची बिले पालिकेने तपासली असता, सुमारे 17 ते 18 मोठ्या हॉस्पिटल्सने हे शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांकडून पैसे आकारले असतील, तर द्यायला नकार का? असा प्रश्न पालिकेने या बैठकीत उपस्थित करत वाढीव दराने बिले देण्याचे आदेश दिले आहेत.