ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) गावात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने गाव कंन्टेमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. तर गावात अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता बुधवार (दि. 22) पासून सोमवार (दि. 27) पर्यंत गाव पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.
गावातील 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आणखी 30 जणांच्या स्वॅबची तपासणी झाली असून त्याचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर आणखी 100 जणांच्या चाचण्या करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. हाच वाढता धोका पाहता गावात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याने व्यापरी, नागरिक, स्थानिक प्रशासन यांची एक बैठक पार पडली व त्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सहायक पोलीस निरिक्षक परशुराम कांबळे, गट विकास अधिकारी हेमंत गरीबे,तालुका वैद्यकीय अधिकारी गोडे आदी उपस्थित होते.
रुग्ण संख्या वाढणे ही बाब गंभीर असल्याची जाणीव झाल्यामुळे येथील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तपणे सहा दिवस कडेकोट बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तर सोमवार (दि. 27) नंतरच्या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळातच व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*