बेळगाव (प्रतिनिधी) – बेळगावात एक रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या संतप्त नातेवाईक जमावाने रुग्णवाहिका जाळली. या शिवाय डॉक्टर व नर्सवर हल्ला करत जिल्हा रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटना रात्री घडली आहे.
डॉ. आंबेडकर रस्त्याजवळ जिल्हा रुग्णालयासमोर हा प्रकार घडल्याने चांगलीच धावपळ उडाली होती. दगडफेकीच्या घटनेत तीन कारचे नुकसान झाले असून पोलीस वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने अॅम्बुलन्सला आग लावली. त्यानंतर डॉक्टर आणि इतरांची बरीच धावपळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन लागलेली भीषण आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी पोलीस आयुक्त त्यागराज, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत सीईओ राजेंद्र के. व्ही. आदींनी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, हा प्रकार कोणी केला या संशयितांचा शोध बेळगाव पोलीस घेत आहेत.