सागर येवले
पुणे -“अंगावर कपडे साधे आहेत. त्यामुळे हे पैसे भरू शकणार नाहीत,’ असा अंदाज येताच “आयसीयू फुल्ल आहे, तुम्ही पेशंट शिफ्ट करा’… असा सल्ला एका मोठ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिला. पण, “त्याचे हेल्थ “इन्श्युरन्स आहे. “पैसे भरू शकतो,’ म्हटल्यावर अवघ्या तासाभरात आयसीयू बेड तयार झाला. असा भीषण अनुभव बड्या खासगी रुग्णालयांत हमखास येतो.
त्यामुळे जीवदान देणाऱ्या “आरोग्य मंदिरात’च रुग्णांची पारख करून उपचार दिले जात असतील, तर खासगी हॉस्पिटल्स फक्त श्रीमंतांसाठीच आहेत का? गरीब, सर्वसामान्य रुग्णांनी जायचे कुठे?, असे प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत शहरातील दोन मोठ्या रुग्णालयांतील अनुभव नाव दोन जणांनी नाव न छापण्याच्या अटीवर “प्रभात’कडे मांडला.
घटना क्र. 1
वेळ सकाळी साडेसातची…. मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे खेडेगावातील डॉक्टरांच्या सल्ल्याने एक कुटुंब पुण्यातील मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले. डॉक्टरांनी आपत्कालीन कक्षात घेतले. मात्र, तेही एका प्रतिष्ठित व्यक्तीने विनंती केल्यावर. नातेवाईकांचे कपडे, धोतर, पायजमा पाहून “आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाही’, तुम्ही पेशंट लगेच शिफ्ट करा’ असे डॉक्टरांनी सांगितले. यावेळीही एका प्रतिष्ठीत व्यक्तीने विनंती केली.
त्यांनाही सुरवातीला आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. मात्र, दबक्या आवाजात एकाने विचारले “पेशंटचे नातेवाईक पैसे भरू शकतील का?’ “बिलासाठी कटकट करणार नाही ना?’ त्याची शाश्वती मिळाल्यावर अवघ्या काही वेळात आयसीयु बेड तयार झाला आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले.
घटना क्र. 2
बंगल्याचे पाडकाम सुरू असताना एक मजूर पडून जखमी झाला. त्यावेळी संबंधित मालकाने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि उपचारासाठी काही रक्कमही तत्काळ भरली. मात्र, व्यक्ती पैसे भरणारा आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी वारंवार पैसे भरण्याचा तगादा लावला. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्ण रिकव्हर झाला, अतिदक्षता विभागाकडून जनरल वॉर्डमध्ये घ्यायचे ठरले. मात्र, “अतिदक्षता विभागाचे बिल भरल्याशिवाय पेशंट शिफ्ट होणार नाही’ असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
“साहेब, रुग्ण शिफ्ट करा. मी दोन दिवसांत पैसे भरतो.’ मात्र, प्रशासनाने ऐकले नाही, उलट बिलाची रक्कम वाढतच गेली. अखेर सोने गहाण ठेवले, मित्रांकडून उधारीवर पैसे गोळा केले आणि बिल भरले. चूक दुसऱ्याची, मात्र माणुसकी म्हणून मदत करायला गेले आणि पैशांसह मनस्ताप सहन करावा लागला.
चांगले उपचार, सुविधा मिळण्याचा अधिकार नाही का?
काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना चांगली सेवा दिली जाते. मात्र, काही रुग्णालयांच्या अंतर्गत नियमांनुसार रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची पारख करूनच उपचार केले जातात. धक्कादायक म्हणजे, काही रुग्णालये तर अत्यावश्यक रुग्णाला दाखलही करून घेत नाही. त्यामुळे नातेवाईकांची फरफट होते. गरीब किंवा सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या रुग्णालयात उपचाराचे अधिकारच नाहीत का? असा प्रश्न पडतो.
धर्मादाय रुग्णालयांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत ठोस भूमिका घेण्यात येत आहे. रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत? त्यामध्ये आयसीयू बेड, जनरल बेड तसेच धर्मादायअंतर्गत किती बेड, याची सर्व माहिती बोर्डवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला, तर कारवाई निश्चित होईल. – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री