पुणे -महापालिकेने शहराच्या पुरवठ्यासाठी 2023-24 वर्षाचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याअंतर्गत जलसंपदा विभागाकडे 20.90 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने अजूनही हे अंदाजपत्रक मंजूर केलेले नाही. जलसंपत्ती नियामक प्राधिकरण्याच्या सूचनेनुसार महापालिकेने 31 जुलैपूर्वी अंदाजपत्रक सादर करणे गरजेचे आहे. तर, जलसंपदा विभागाकडून ते ऑगस्ट अखेरपर्यंत मंजूर करणे अपेक्षित आहे.
त्यानुसार पालिकेने वेळेत अंदाजपत्रक सादर केले होते. दरम्यान, महापालिका आणि जलसंपदा विभागात पाण्याच्या सुमारे 667 कोटी रुपयांच्या थकबाकीवरून वाद सुरू असल्याने महापालिकेवर थकबाकीसाठी दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकास उशीर केला जात असल्याची चर्चा आहे.
अंदाजपत्रकानुसार, राज्य शासन महापालिकेसाठीचा पाणीकोटा निश्चित करते. या शिवाय, महापालिकेस पुढील वर्षभरासाठी किती पाणी मिळेल याचा प्राथमिक अंदाज आल्यास महापालिकेस शहराच्या पाण्याचे नियोजन करणे सोपे जाते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी खडकवासला धरणसाखळीत 95 टक्के पाणीसाठा आहे.
मात्र, जिल्ह्यात पाऊस नसल्याने सिंचन तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेता, महापालिकेसही पुढील वर्षभर काटकसर करून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. महापालिकेस जादा पाणी वापरावर दंड भरावा लागत असल्याने पाण्याची तसेच खर्चाची बचत करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर होणे गरजेचे आहे.
अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे
72 लाख : लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी
56 लाख : शहराची गृहीत लोकसंख्या
10 लाख 34 : समाविष्ट गावांची लोकसंख्या
4 लाख : शहराची तरल लोकसंख्या
13.57 टीएमसी : पाण्याची लोकसंख्येनुसार मागणी
7.33 टीएमसी : गळती गृहीत धरून 20.90 टीएमसी पाण्याची मागणी