मुंबई – तिच्या उत्कृष्ट डान्स नंबरसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीने ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नोराला काही चित्रपटात कामही मिळाले पण साकी-साकी, दिलबर, गरमी या आयटम साँगनेच नोराला ओळख दिली. आता मात्र नोराला अभिनयात जास्त रस आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका न मिळाल्याने ती भावुक झाली आहे, तसेच तिने केवळ चार अभिनेत्रींना इंडस्ट्रीत काम मिळाल्याचा आरोपही केला आहे.
नोरा फतेहीने अलीकडेच मुलाखतीत तिची वेदना व्यक्त केली आणि कोणाचेही नाव न घेता म्हणाली की, चित्रपट निर्माते चौकटीच्या बाहेर विचार करत नाहीत. इंडस्ट्रीत फक्त चार मुली आहेत ज्यांना काम मिळत आहे. या मुलाखतीत नोरा म्हणाली, ‘मी डान्स करते त्यामुळे ते मला कास्ट करू इच्छित नाहीत असे मला वाटत नाही. बॉलीवूडमध्ये अशा अनेक आयकॉनिक अभिनेत्री आहेत, ज्या खूप सुंदर नृत्य करतात आणि त्या डान्स नंबरमध्ये देखील अप्रतिम आहे. त्यामुळे चांगली अभिनेत्री बनणे हा पॅकेजचाच एक भाग आहे.
नोरा पुढे म्हणाली, आजच्या काळात इंडस्ट्रीत स्पर्धा वाढली आहे. वर्षभरात मोजकेच चित्रपट आले आहेत आणि चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे काय आहे ते पाहता येत नाही. तर फक्त 4 मुली चित्रपट करत आहेत. त्यांना आलटून पालटून काम मिळत आहे. चित्रपट निर्मात्यांनाही तेच चार आठवतात. याच्या बाहेर ते विचारही करत नाहीत. तर तुझे काम त्या चौघांना थांबवून पाचवे होण्याचे आहे.’ असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.