वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये केवळ राजकीय किंवा आर्थिक कारणामुळेच संघर्ष होत आहे असे नाही तर आता चीनने अमेरिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा घुसखोरी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील अनेक पब्लिक स्कूलना चीनने दोन कोटी डॉलर पेक्षा जास्त आर्थिक मदत दिली आहे ज्या पब्लिक स्कूलला चिनने आर्थिक मदत दिली आहे त्यापैकी 20 पब्लिक स्कूल अशा ठिकाणी आहेत.
जेथून अमेरिकेचे लष्करी तळ खूपच जवळ आहेत साहजिकच चीनच्या या आर्थिक मदतीकडे संशयाने पाहिले जात आहे अमेरिकेतील गुप्तहेर संस्थांनी चीनने मदत केलेल्या या पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि तेथील काही शिक्षकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे विशेषतः शिक्षकांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे अमेरिकेतील आघाडीच्या पेरेंट्स डिफेंडिंग एज्युकेशन या सामाजिक संस्थेने आपला एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
ज्या पब्लिक स्कूलला चीनने आर्थिक मदत दिली आहे त्या शाळांमध्ये पाच ते सहा वयोगटातील मुले शिक्षण घेत आहेत साहजिकच या शाळांना आर्थिक मदत करण्याच्या निमित्ताने कम्युनिस्ट धोरण प्रसारित करण्याचा चीनचा विचार असावा अशी शंकाही घेण्यात येत आहे या शाळेत अतिशय लहान मुले शिकत असल्यामुळे त्यांची मानसिकता या वयात तयार होऊ शकते म्हणूनच चीनची ही शैक्षणिक घुसखोरी चिंतेची मानण्यात येत आहे.
अमेरिकेतील आघाडीच्या तीन सायन्स आणि टेक्नॉलॉजी स्कूललाही चीनकडून आर्थिक मदत केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे रिपब्लिकन पार्टीने हा विषय उपस्थित केला असून त्यावरून अध्यक्ष जो बायडन यांच्या विरोधात वातावरण निर्मिती तयार करण्यास प्रारंभ केला आहे रिपब्लिकन खासदार जिम बँक यांनी याविषयी अमेरिकेच्या शिक्षण मंत्र्यांना एक पत्रही पाठवले असून या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे शैक्षणिक क्षेत्रातील चीनच्या या घुसखोरीबाबत बायडेन प्रशासनाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसल्याने रिपब्लिकन पक्ष जास्तच आक्रमक होत आहे.