मुंबई – डिसेंबर महिन्यात देशात रिटेल विक्रीत सात टक्के वाढ झाली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात विक्री वाढली होती. मात्र शेवटच्या आठवड्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यामुळे रिटेल विक्रीवर परिणाम झाला असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्यात रिटेल विक्री 26 टक्क्यांनी वाढली होती. मात्र नंतर या विक्रीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, बऱ्याच राज्यांनी काही निर्बंध जाहीर केले आहेत. त्याचा मोठ्या शहरातील विक्रीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यात सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत 7 टक्के घट झाली. त्याचबरोबर फर्निचरच्या विक्रीतही 5 टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी आम्हाला मिळाली आहे. माहिती तंत्रज्ञान यंत्रणेसाठी लागणारी उपकरणे, क्रीडासाहित्य, दागिने, पादत्राणे, कपडे, इत्यादीची विक्री काही प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये अजून तरी घट नोंदली गेलेली नाही. केंद्र सरकार व विविध राज्यांना आम्ही निर्बंध कडक करू नका असे सांगितले आहे.
ओमायक्रॉनमुळे इस्पितळात दाखल झालेल्या व्यक्तीच्या संख्येवरून निर्बंध कडक करण्यात यावे. केवळ चाचणीमध्ये करोना व्हायरस असल्याचे आढळून आल्यामुळे निर्बंध लागू करू नयेत असे आम्ही राज्य सरकारला सांगितले आहे. मात्र तरीही परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून बड्या महानगरांमधील निर्बंधाची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचबरोबर नागरिक स्वतः भीतीने खरेदी करण्यासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.