नवी दिल्ली – अमेरिकेबरोबर जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे व्याजदर वाढीचे संकेत आगोदरच फेडरल रिझर्व्हकडून देण्यात आले आहेत. लवकरच होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समिती बैठकीत याची घोषणा औपचारिकरीत्या केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील वाढीव महागाईची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होणार आहे. या कारणामुळे आगामी काळात जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता बळावली आहे.
महागाई आणि व्याजदरवाढीच्या कारणामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत असून अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक नफ्यासाठी सोन्याची खरेदी करण्याची शक्यता असून त्यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात असे विश्लेषकांना वाटते.
दरम्यान मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 104 रुपयांनी वाढून 46,606 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 408 रुपयांनी वाढून 59,700 रुपये प्रति किलो किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,809 डॉलर व चांदीचा दर 22.63 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.