Parliament Winter Session: यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) कधी सुरु होईल याच्या तारखा अजून निश्चित करण्यात आल्या नाहीत, परंतु, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, ख्रिसमसपूर्वी (Christmas) हिवाळी अधिवेशन आटोपते घेण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
येत्या 3 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीनंतर काहीच दिवसांत संसदेचं हिवाळी अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे, तसेच ख्रिसमसपूर्वी अधिवेशन आटोपले जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रमुख फौजदारी कायद्यांच्या जागी तीन महत्त्वाच्या विधेयकांवर विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संसदेत प्रलंबित असलेले दुसरं मोठं विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेले हे विधेयक विरोधी पक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने आग्रह धरला नाही. या विधेयकाद्वारे सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा दर्जा कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीनं आणायचा आहे. सध्या त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष आहे.
दरम्यान, सर्वसाधारणपणे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी आटोपले जाते. परंतु, यंदा अधिवेशनाबाबत कोणतीही माहिती अद्याप केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा अधिवेशन कधी? अशा चर्चा सुरू आहेत.