पुणे – सलग दोन दिवसांपासून करोनाबाधितांचा आकडा दोनशेपार जात होता. मात्र, सोमवारी ही संख्या तब्बल 100 ने घटली. यात 102 नवे बाधित आढळले आहेत. पण, दिवसभरात करोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
यात वयवर्षे 43 ते 75 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. तर, उपचारांनी ठणठणीत झालेल्या 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 419 जणांचे नमुने घेण्यात आले होते. बाधित सापडलेल्यांमध्ये डॉ. नायडू-38, ससून-19 आणि खासगी रुग्णालयात 45 बाधित व्यक्ती सापडल्या आहेत.
शहरातील बाधितांची संख्या 3 हजार 598 वर पोहचली आहे. तर, आणखी 148 जण अत्यवस्थ आहेत. त्यातील 50 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले असून, 98 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत मिळून 1 हजार 599 बाधितांवर उपचार सुरू असून, 3 हजार 403 जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.