वाघळवाडी (वार्ताहर) – सोमेश्वरनगर परिसरातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी परिसरातील 66 लोक छत्तीसगडला रवाना करण्यात आले आहेत. बारामती महसूल विभाग आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुढाकार घेत तीन बसेसमधून या लोकांना छत्तीसगडला सुखरूप रवाना केले.
सोमेश्वरनगर परिसरात मुरूम, वाणेवाडी आणि वाघळवाडी या ठिकाणी वीटभट्टी, बांधकाम आणि खडी क्रशरवर हे लोक गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत होते. बारामती महसूल विभागाने पुढाकार घेत या लोकांना सुखरूप आपल्या गावी पाठविले. यामध्ये लहान मुले, महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे.
यावेळी वाणेवाडीचे गावकामगार तलाठी ए. डी. होळकर, वडगाव निंबाळकरचे पोलीस हवालदार महेंद्र फणसे, गोपनीय विभागाचे ज्ञानेश्वर सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील टप्प्यात झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक पाठविले जाणार आहेत.