नगरसेवक शिंदे : प्रशासनासमोर मांडल्या विद्यार्थी-पालकांच्या समस्या
पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्था मार्चपासून अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बहुतांश शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. परंतु शाळा व्यवस्थापनाकडून या महामारीच्या काळातदेखील फीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात अपमानित करण्यात येत असून पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे चिंचवड येथील एल्प्रो पॅरेंट्स असोसिएशन (ईपीए)तर्फे चिंताग्रस्त पालकांच्या तक्रारी
महापालिका प्रशासनासमोर मांडल्या असल्याचे भाजपाचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.
या असोसिएशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये शाळा व्यवस्थापनाने चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच फी घ्यावी. शालेय उपकरणे अथवा इतर सोयीसुविधांचा विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांची फी कमी करण्यात यावी.
पालक शिक्षक संघटना व कार्यकारी पालक शिक्षक संघटना यांच्या स्थापनेत पारदर्शकतेचा अभाव आहे. पालकांना सतत फोन करून फीसाठी तगादा लावला जात आहे. काही शाळा व्यवस्थापनांनी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्गात प्रवेश रोखला होता. महापालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण प्रवेश आणि कायम लॉगिन प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी एल्प्रो पॅरेंट्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक शीतल शिंदे यांनी दिली.
शाळेच्या नावात बदल
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या नावात बदल करून एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल असे केले आहे. याबाबत पालक व विद्यार्थी यांना अंधारात ठेवण्यात आले होते. हिंदी चॅरिटी ट्रस्ट हे शालेय व्यवस्थापन व जीआयआयएस के 12 एज्युकेशन प्रा.लि. यांच्यातील कायदेशीर वादामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित खटल्याद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील माहिती समोर आल्यानंतरच पालकांना ही माहिती कळाली. जीआयआयएसचा ब्रॅंड जास्त काळ टिकला नाही म्हणून पालकांनी शाळेवर ठेवलेल्या विश्वासाचे उल्लंघन आहे. त्यामुळे शाळेची फी कमी करण्याची मागणी पालकांनी केली आहे, अशी माहिती नगरसेवक शीतल शिंदे यांनी दिली.