राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट; शरद पवारांना भेटण्याचा सल्ला

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले.

राज ठाकरे म्हणाले कि, वाढीव वीज बिलाप्रश्नी  राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. परंतु, याप्रकरणी कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचे काही दडपण नाही म्हणत आहे.

तसेच, नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितले, पण अजून तो होत नाही. याविषयी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला राज्यपालांकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. 

अनेकांचे रोजगार गेलेत, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार? एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागत आहेत याला काय अर्थ आहे. एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा अशी विनंती आहे. राज्यपालही बोलणार आहेत. सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

तसेच शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा भाव हा न्याय्य असायला हवा. या मागणीकडे पण सरकारने तात्काळ लक्ष द्यायला हवे होते. पण ते होताना दिसत नाही. म्हणूनच राज्यपालांनी या दोन्ही विषयांत लक्ष घालण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती पक्षातर्फे राज्यपालांना करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.