पुणे (प्रतिनिधी) : सदनिका भाडेतत्वावर देण्याची जाहीरात संकेतस्थळावर दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी बतावणी करून एकाच्या बँक खात्यातून तीस हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदाराची कोंढवा भागात सदनिका आहे. त्यांनी सदनिका भाडेतत्वावर देण्याबाबत एका संकेतस्थळावर जाहीरात दिली होती. संकेतस्थळावर त्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक दिला होता. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून सदनिका भाडेतत्वावर घेण्याबाबत बतावणी केली.
त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवितो, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली.
चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तीस हजार रुपये लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.