नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी आज (मंगळवारी) दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. अशातच ते आज राहुल गांधी यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहचले.
प्रशांत किशोर – राहुल गांधी यांच्यादरम्यान झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. पुढील वर्षी पंजाब येथे विधानसभा निवडणुका होणार असून यापूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व नवजोत सिंग सिद्धू यांच्यात राजकीय कलह निर्माण झाला आहे. निवडणुकांमध्ये हा वाद काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू नये यासाठी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जातोय. प्रशांत किशोर व राहुल गांधी यांच्या दरम्यान झालेली ही भेट देखील याच पार्श्वभूमीवर झाल्याचं बोललं जातंय.
तत्पूर्वी, राहुल गांधी व प्रशांत किशोर यांनी २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नवजोत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरु असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे देखील राहुल गांधी यांच्या भेटीस पोहचले होते.
काही आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह व नवजोत सिंग यांच्यात शाब्दिक चकमक उडल्याचं पाहायला मिळालेलं. याबाबत काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अमरिंदर सिंह यांचा चेहरा घेऊन उतरण्याच्या समर्थानात आहे. मात्र यासोबतच पक्षाला सिद्धू यांना देखील सोबत घेऊन चालायचं आहे.
दुसरीकडे नवजोत सिंग सिद्धू अद्यापही पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वबदलासाठी आग्रही आहेत. पक्षाकडून त्यांना पक्ष संघटनेत सन्मानजनक स्थान देऊन मनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही सूत्रांकडून कळतंय.