नगर बाजार समितीत कांदा दीडशे रुपये किलो

नगर  – नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज झालेल्या लिलावात कांद्याला दीडशे रुपये, तर लाल कांद्यास 90 ते 130 रुपये किलो असा दर मिळाला. आजच्या बाजारभावाने नवा उच्चांक गाठला. मागील काही महिन्यांपासून कांद्याची आवक कमी होत असून, कांद्याचे दर रोज वाढत आहेत. देशभरात कांद्याची मागणी वाढली आहे.

नगर बाजार समितीत रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव होत आहेत. आज शेतकऱ्यांनी सुमारे 30 हजार गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यात चांगल्या दर्जाच्या लाल कांद्याला विक्रमी 150 रुपये किलोचा भाव मिळाला. गावरान तसेच काहीशा कमी प्रतीच्या लाल कांद्यालाही 90 रुपयांपासून ते 130 रुपये भाव मिळाला.

यावर्षीचा हा उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. नगर बाजार समितीत चांगल्या दर्जाचा व टिकाऊ कांदा येत आहे. सध्या नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अवकाश असल्याने कांद्याचे दर असेच वाढत राहण्याची शक्‍यता असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. सोमवारी (दि.2) झालेल्या लिलावात कांद्याला 11 हजार रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळाला होता. आता त्या वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब झाला आहे.

कांद्याची वाटी 30 रुपये
हॉटेल व उपाहारगृहांत कांद्याऐवजी मुळा, काकडी व गाजर दिले जात आहे. कांद्यासाठी स्वतंत्र दर आकारण्यात येत असून, कांद्यासाठी 30 रुपये वाटी याप्रमाणे दर आकारले जात आहेत. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना वाटीप्रमाणे दर देऊन कांदा खावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.