मांडवगण फराटा – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी, इनामगाव, मांडवगण फराटा, बाभुळसर बुद्रुक, वडगाव रासाई, नागरगाव परिसरात कांद्याच्या डेंगळ्याचे पिक फुलोऱ्यात आलेले आहे.
यावर्षी कांद्याला प्रथमच बाजारभाव चांगला मिळाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत पहिल्यांदाच कांदा किलोला 100 रुपयांवर गेला. परंतु, या बाजारभाव वाढीचा कमीच शेतकऱ्यांना लाभ झाला. बाजारभावात चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे नियोजन केले.
परंतु, परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे सडून गेली. त्यामुळे रोपांचा तुटवडा भासला. शेतकऱ्यांनी कांदा बी तयार करण्यासाठी ढेंगळेचे पीक शेतात घेतले. परंतु, सततचे धुके, ढगाळ हवामानाचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या ढेंगळ्यांचे पीक देखील सडून खराब झाले.
आता अत्यंत कमी शेतकऱ्यांच्या शेतात ढेंगळ्याचे पीक दिसून येत आहे. पुढील रब्बी हंगामात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे बी उपलब्ध होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे. यंदा कांद्याचे बी साधारणपणे 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत विकण्यात आले होते. हाच बाजारभाव पुढील हंगामात दुप्पट होण्याची शक्यता आहे.
बियाण्यांचा तुटवडा भासणार
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कांद्यांचे ढेंगळ्याचे पीक कमी प्रमाणात दिसून येत आहे. अतिवृष्टी, सततचे बदलणारे हवामान याचा फटका कांदा उत्पादकांबरोबरच कांदा बियाण्यांना देखील बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने बियाण्यांचा तुटवडा भासणार आहे.