शिवजयंतीनिमित्त राजवाड्याची रंगरंगोटी; विद्युत रोषणाईने परिसर उजळणार
माजी खासदार उदयनराजे भोसले हे शिवजयंतीनिमित्त बुधवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. तेथे राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीsaस हेदेखील उपस्थित राहणार आहेत. उदयनराजे पुण्यातून हेलिकॉप्टरने शिवनेरीवर जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साताऱ्यातील मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
सातारा – सातारा पालिकेच्यावतीने साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवात साक्षात शिवकाळ अनुभवण्यासाठी शाहूनगरी सज्ज झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या राजवाड्याची रंगरंगोटी करण्यात आली असून राजवाड्याच्या दर्शनी भागात भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. राजवाडा व गोल बागेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शिवजयंतीसाठी शाहूनगरीत ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून शिवमुद्रा असलेले झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वातावरण भगवे झाले आहे. शिवजयंतीची भव्य मिरवणूक उद्या, दि. 19 रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानावरून सुरू होणार आहे. राजवाड्याच्या दर्शनी भागातील शिसवी तुळया व भव्य दरवाजाची रंगरंगोटी करण्यात आली शोभेचे दिवे सुरू करण्यात आले आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला राजवाडा विद्युत रोषणाईने झळाळला.
राजवाड्याचे मनोहारी रूप सातारकर आपल्या डोळ्यांत साठवत आहेत. राजवाडा, अजिंक्यतारा, कमानी हौद आणि पोवई नाक्यावरील शिवतीर्थ ही साताऱ्यातील सर्व महत्त्वाची स्थळे विद्युत रोषणाईने उजळली आहेत. शिवतीर्थाची रंगरंगोटी करण्यात आली. साताऱ्यातील शिवप्रेमींनी पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसराची आज स्वच्छता केली. मंगळवारी रात्रीपासून परजिल्ह्यांमधून शिवज्योतींचे आगमन सुरू झाले.
शिवजयंती मिरवणुकीत छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारीत चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्यांची तयारी पूर्ण होत आली आहे. या शिवाय मिरवणुकीत झांज, लेझीम पथके, शिंग, तुतारीवाद, घोडेस्वार मावळेही सहभागी होणार आहे. शिवजयंती मिरवणूक राजवाडा-राजपथ-शेटे चौक-पोलीस मुख्यालय या मार्गाने पोवई नाक्यावरीव शिवतीर्थावर पोहोचणार आहे.
या मिरवणुकीत माजी खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक, मान्यवर व शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवाच्या तयारीची पाहणी माधवी कदम व किशोर शिंदे यांनी स्वतः काल (दि. 17) केली. शिवजयंतीनिमित्त पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे.