करोना व्हायरस मांसाहारातून पसरत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने केले स्पष्ट
मंचर – कोरोना व्हायरस हा आजार अंडी, चिकन, मटण, मच्छी यामधून पसरत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केल्याने मांसाहाराला आंबेगाव तालुक्यात मागणी वाढली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून, 455 रुपये शेकडा दराने अंड्यांची विक्री होत असल्याचे अंडी विक्रेत्यांनी सांगितले.
करोना व्हायरस या आजाराबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्याने ग्रामीण भागातील अंडी उत्पादक शेतकऱ्यांचे अंड्याला बाजारभाव नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यःस्थितीत इंग्लिश अंडी बाजारभावाची परिस्थिती सुधारली असून, दर शेकडा 455 पर्यंत पोहोचले आहेत. आठ दिवसापूर्वी अंड्याचे दर शेकडा 400 ते 420 रुपयांदरम्यान होते. कोरोना व्हायरसबद्दल चुकीची अफवा पसरल्यामुळे अंड्यांचे दर शेकडा 40 ते 50 रुपयांनी घसरले होते.
मंचर परिसरात प्रकाश तापकीर, कांताराम टाव्हरे, नितीन बारवे, मुकुंद बारवे, गोविंद थोरात, तुषार कानडे, संदीप कानडे, नरेन कानडे, योगेश कानडे यांच्यासह अंडी उत्पादक शेतकऱ्यांचे बाजारभाव कोसळल्याने नुकसान झाले. करोना व्हायरसची भीती नागरिकांमध्ये पसरल्यामुळे अंड्याला उठाव कमी झाला असून भावही कोसळले होते; परंतु आता परिस्थिती मागील चार दिवसांपासून सुधारली असूनअंड्यांचे दर शेकडा 455 पर्यंत पोहचले आहे. थंडी असूनही अंड्याला भाव नसल्याचे दिसून येत आहे. थंडीमध्ये अंड्याचे दर शेकडा 500 ते 550 रुपयांपर्यंत पोहचले होते.
कोरोनाचा आणि मांसाहाराचा संबंध नाही
मांसाहाराबाबत चुकीच्या अफवांकडे लक्ष न देता नागरिकांनी अंडी, चिकन, मटन, मच्छी असा मांसाहार करण्यास काहीही हरकत नाही. यामधून मोठ्या प्रमाणात प्रोटिन, कॅल्शियम मिळते.य ामुळे मांसाहार करण्यासाठी काहीच हरकत नसल्याचे पोल्ट्री व्यवसायातील तज्ज्ञ आंबेगाव ऍग्रोचे शफीभाई मोमीन, डॉ. अजित रानडे आणि जावेद मिस्त्री, इम्रान मोमीन,इसाक शेख यांनी सांगितले.