Onion Export Ban : केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे राज्यातील बळीराजला मोठा फटका बसला आहे. निर्यात बंदीमुळे कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांत कांद्याचे भाव क्विंटल मागे ११०० ते १२०० रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी २७०० ते २८०० रुपये क्विंटल भाव होता. केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात कांद्याचे भाव कोसळत आहेत. १००० ते १५०० रुपये दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. १५ दिवसांत कांदा निम्म्याहून अधिक कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.
लाल कांद्याला ५०० ते १७११ सरासरी १५०० रुपये क्विंटल तर सफेद कांद्याला ४५२ ते ११०० सरासरी ९८० रुपये क्विंटल असा भाव होता. मक्याची ३२ नग आवक होऊन १९५१ ते २३११ सरासरी २०७५ रुपये प्रतिक्विंटल असे मक्याचे भाव होते. मका बाजार भाव सध्या स्थिर आहेत तर कांद्याचे भाव मात्र घसरणीला लागले आहेत. घाऊक बाजारात कांदा वधारल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण निर्यात बंदी जाहीर झाली आणि कांद्याच्या भावाला ग्रहण लागले ते अद्यापपर्यंत कायम आहे. त्यानंतर सातत्याने कांद्याचे भाव गडगडत आहेत.
दरम्यान, लासलगाव बाजार समितीत आठ हजार १९२ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला सरासरी दीड हजार रुपये दर मिळाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत १०० रुपयांनी दर कमी झाले. अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक जवळपास थांबली आहे. आता नवीन लाल कांदा बाजारात येत आहे. या कांद्याची साठवणूक करता येत नाही. तो काढणीनंतर लवकर विक्रीस न्यावा लागतो. त्यामुळे दर घसरलेले असतानाही तो विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.