नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने मंगळवारी सांगितले की, सागर सम्राटने अरबी समुद्रात तेल आणि वायूचे उत्पादन सुरू केले आहे. सागर सम्राटची ऑफशोर ड्रिलिंग रिग 23 डिसेंबर 2022 रोजी मोबाईल ऑफशोर प्रोडक्शन युनिट (मोपू) म्हणून कार्यान्वित करण्यात आली.
सागर सम्राट जॅकअपद्वारे व्यवस्थापित केले जाते, ते सन 1972 पासून कार्यान्वित करण्यात आले असून, मुंबईजवळील बॉम्बे हायमधून याचद्वारे तेल आणि भूगर्भ वायूचे उत्पादन सुरू करण्यात आले होते.
सागर सम्राट मोपू प्रतिदिन 2.36 दशलक्ष घनमीटर वायू उत्पादन क्षमतेसह प्रतिदिन 20,000 बॅरल क्रूड ऑइल उत्पादित करू शकते. डब्ल्यूओ 16 क्लस्टरमधून आता याद्वारे किनाऱ्यावर तेल पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. डब्ल्यूओ 16 क्लस्टर हे अरबी समुद्रातील 75-80 मीटर खोलीवर आणि मुंबईपासून 130 किमी अंतरावर असलेल्या चार क्षेत्रांचा समूह आहे. बॉम्बे हायपासून या क्लस्टरचे अंतर सुमारे 40 किमी आहे.
जॅक-अप रिग सागर सम्राटला मोपूमध्ये रूपांतरित करण्याचा प्रकल्प 17 नोव्हेंबर 2011 रोजी संबंधित कंपन्यांना प्रदान करण्यात आला. 16 एप्रिल 2022 रोजी मोपू यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले.