लाहोर – पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना आपली हत्या करायची होती. असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी (General Bajwa wanted to get me killed, alleges Imran Khan) केला आहे. आपली हत्या करून देशात आणीबाणी लागू करण्याची जनरल बाजवा यांची इच्छा होती, असेही इम्रान खान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
इम्रान खान यांनी काढलेल्या लॉंग मार्च दरम्यान वझिराबादेत दोन बंदुकधाऱ्यांनी इम्रान यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये इम्रान यांच्या पायाला गोळी लागली होती.
जनरल बाजवा यांच्यावर आरोप करू नयेत, असे आपल्याला अनेकजणांनी सांगितले होते. मात्र जनरल बाजवा यांनी केलेल्या गुन्ह्यांना लपवण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. असेही इम्रान खान म्हणाले.
अमेरिकेने केलेल्या कारस्थानानुसार आपले सरकार उलथवण्याचे काम जनरल बाजवा यांनीच केले असल्याचा आरोप इम्रान खान यांनी पूर्वी केला होता. 2019 साली जनरल बाजवा यांना लष्कर प्रमुख पदावर मुदतवाढ देऊन आपण मोठी चूक केल्याचेही इम्रान म्हणाले होते.