दुबई – जागतिक पातळीवरून ऑनलाईन अभियान सुरू झाल्यावर इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. या आंदोलनातील हिंसाचाराबद्दल फाशी देण्यात आलेल्या एका व्यक्तीला तरानेह अलिदूस्ती या अभिनेत्रीने पाठिंबा दर्शवला होता. म्हणून तीन आठवड्यांपूर्वी तिला अटक करण्यात आली होती.
अलिदूस्ती हिने असघर फरहादी यांच्या “द सेल्समॅन’ या ऑस्कर विजेत्या सिनेमात काम केले होते. हिजाब विरोधी आंदोलनाला अलिदूस्ती हिच्यासह इराणमधील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवला होता. तिने या आंदोलनाच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर 3 पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर तिचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. या आंदोलनातील हिंसाचाराबद्दल इराणमध्ये डझनभर लोकांना पाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईदरम्यान 516 जण ठार झाले आहेत आणि 19 हजारापेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
अलिदूस्ती हिच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे 600 कलाकारांनी आवाज उठवला होता. तर काही जणांनी पुढाकार घेऊन ऑनलाईन याचिकादेखील केली होती.