वाघोली – दारू पिण्याच्या वादातून झालेल्या दोन कामगारांच्या भांडणामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाली. ही घटना तुळापुर येथील यल्लम्मा देवीच्या मंदिराजवळील कामगारांसाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेडजवळ घडली.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दुसऱ्या कामगाराला अटक केली आहे. सुरेश (पूर्ण नाव माहित नाही), असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. मारहाण करून खून केल्याप्रकरणी धर्मराज भानुदास तळी (मारवडी, अकोला) यास पोलिसांनी अटक केली आहे. कंत्राटदार राजू मेडकर यांनी कामगारांसाठी मंदिराजवळ पत्र्याचे शेड बांधले आहे.
जवळच मोकळ्या जागेमध्ये सुरेश व धर्मा तळी यांच्यामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. धर्मा याने दांडक्याने सुरेश याला मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने सुरेशला वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. न्यायालयाने धर्मा तळी याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.