असे करायचे “ते’ पोलिसांनाच सावज
पिंपरी – पोलीस उभे असलेल्या ठिकाणी ते जाणीवपूर्वक वाहतुकीच्या निमयांचा भंग करायचे, मिटवा-मिटवीच्या नावाखाली जबरदस्तीने पोलिसांच्या हातात पैसे ठेवायचे, पैसे हातात आहेत अशी क्लीप काढायची आणि त्याच क्लिपच्या आधारे पोलिसांना ब्लॅकमेल करायचे. नोकरी शाबूत ठेवायची असेल तर आम्हाला पैसे द्या, अशी मागणी करीत ते पोलिसांकडे खंडणी मागायचे. मात्र आता त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे.
रवींद्र भागवत सातपुते (वय 27, रा. हनुमाननगर, बारामती) आणि सुमीत गोवर्धन बेरड (वय 22, रा. कैलासनगर, पुनावळे) अशी पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवड स्टेशन येथे एका वाहतूक पोलिसाकडे खंडणी मागताना त्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. स्पाय कॅमेरा लावून ते जाणीवपूर्वक वाहतुकीच्या निमयांचा भंग करीत असे. त्यानंतर मिटवा-मिटवीच्या नावाखाली जबरदस्तीने पोलिसांच्या हातात पैसे देत असे. पैसे देतानाचा व्हिडिओ नंतर पोलिसाला दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळत असे.
औंध परिसरातील एका वाहतूक पोलिसाला अशाच प्रकारे आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढले आहे. गेल्या आठ महिन्यात त्या पोलिसाला ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. मात्र भितीपोटी त्या पोलिसाने तक्रार दिली नाही. यामुळे आरोपींचा विश्वास आणखी वाढल्याने ते पोलिसांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होते.
जगताप डेअरी आणि भूमकर चौक या परिसरात वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणाच्या वर आरोपी सातपुते याने कॅमेरा लावला होता. त्यात दिसणाऱ्या पोलिसांकडेही ते खंडणी मागणार होते. अशाच प्रकारे आरोपीने मोरवाडी येथील एका पोलिसांची चित्रफीत काढली.
त्या पोलिसांकडून पैसे मिळत नाही, असे दिसताच त्याने ती क्लीप एका चॅनेलवाल्याला देऊन प्रामाणिकपणाचा आव आणत प्रसिद्धी मिळवून घेतली. इलेक्ट्रॉनिक मीडियावरील याच बातमीच्या आधारे तो इतर पोलिसांना धमकावत होता. आरोपी सातपुते आणि बेरड हे दोघेजण एका दुकानात कामाला होते. त्यानंतर आरोपी सातपुते एका मॉलमध्ये कामाला लागला. त्यानंतर बारामती येथे तो बहिणीचे कपड्याचे दुकान सांभाळू लागला.
कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात यायचा आणि पोलिसांसाठी सापळा लावायचा. रविवारी पोलीस कोठडीत त्याने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आता त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याने लावलेल्या सापळ्यात आता तोच आणखी अडकत चालला आहे.