…’त्या’ ट्रेमधील दागिने होते मुलामा दिलेले

ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे मुंबई महामार्गावरून पळाले


दोन कोटींच्या नाही, तर 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी

पुणे –  कोथरूडच्या आनंदनगर परिसरातील पेठे ज्वेलर्समध्ये दोन चोरट्यांनी गोळीबार करत रविवारी दागिने लुटले. मात्र, चोरट्यांनी लुटलेले बहुतांश दागिने हे गोल्ड प्लेटेड अर्थात मुलामा दिलेले होते. या घटनेत 10 लाख 13 हजारांचे दागिने चोरीला गेले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोठे हार कर्मचाऱ्यांकडून घेऊन चोरटा बॅगेत टाकत असल्याचे दिसत होते. हे मोठे हार फक्त गोल्ड प्लेटेड होते.

सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला असून पोलिसांची पथके गुन्हेगारांच्या मागावर रवाना झाली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते. पोलिसांनी रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे चांदणी चौकातून महामार्गावरुन मुंबईकडे गेल्याचे दिसत आहे.

कोथरूडच्या आनंदनगर भागात मुख्य चौकात पेठे ज्वेलर्स आहे. येथे ग्राहक असल्याचा बहाणा करत दोघे रविवारी 4 वाजून 35 मिनिटांनी दुकानात घुसले. त्यांनी कंबरेला लावलेले पिस्तूल काढून कामगारांना धमकावत दुकान लुटण्यास सुरुवात केली.

कामगारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एकाने पिस्तूलमधून हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळी मिसफायर झाली. दरम्यान, गुन्हेगाराच्या मागावर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके आहेत.

15 मिनिटांत थरार
संबंधित दुकान दुपारच्या वेळेस बंद असते. ते 4 वाजता उघडते. दुकान उघडल्यानंतर दहाच मिनिटांत चोरटे घुसले. त्यांनी दहा ते पंधरा मिनिटांत लूट केली. चोरटे निघून गेल्यावर कर्मचारी काही काळ स्तब्ध झाले. यानंतर त्यांनी दुकान मालकाला फोन करून माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.