IPL 2024 (LSG vs KKR Match Result ) : आज आयपीएल 2024 चा 54 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला . हा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केला आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम खेळून 235 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 16.1 षटकात 137 धावांत गडगडला.
या विजयासह कोलकाता 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी, लखनौची निव्वळ धावगती -0.371 झालीी असून त्याचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. लखनौ आता 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. त्याच वेळी, कोलकाता 11 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर आयपीएलचा 60 वा सामना खेळताना दिसणार आहे.
236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिला धक्का 20 धावांच्या स्कोअरवर बसला. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या अर्शीन कुलकर्णीला मिचेल स्टार्कने बाद केले. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. संघाला दुसरा धक्का केएल राहुलच्या रूपाने बसला जो 25 धावा करून परतला.
या सामन्यात मार्कस स्टॉइनिसशिवाय एकही फलंदाज चांगला खेळला नाही. त्याने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी खेळली. कोलकात्या विरुद्ध दीपक हुडाने पाच धावा, निकोलस पुराणने 10, आयेशा बडोनीने 15, टर्नरने 16 धावा, कृणाल पांड्याने पाच धावा, युधवीर सिंगने सात धावा, रवी बिश्नोईने दोन धावा केल्या. तर नवीन-उल-हक एकही धाव न काढता नाबाद राहिला.
कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय रसेलला दोन आणि मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 6 बाद 235 धावा केल्या होत्या. या मैदानावरील टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर सुनील नरेनने सर्वाधिक धावा केल्या. सुनील नरेनने 39 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार मारले.
Breached 𝟐𝟎𝟎 at Ekana in style!
Time to defend it 💪 pic.twitter.com/yjCxZ6Qvop
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 5, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. या संघाचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी झंझावाती सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी 4.2 षटकात 61 धावा जोडल्या. 14 चेंडूत 32 धावा करून फिल सॉल्ट नवीन उल हकचा बळी ठरला.
अंगकृश रघुवंशीने 26 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. तर आंद्रे रसेल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. 8 चेंडूत 12 धावा करून आंद्रे रसेलला नवीन उल हकने बाद केले. रिंकू सिंग 11 चेंडूत 16 धावा करून नवीन उल हकच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यरने 15 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. रमणदीप सिंगने 6 चेंडूत 25 धावा करत डावाचा शानदार शेवट केला.
लखनौ सुपर जायंट्ससाठी नवीन उल हक हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नवीन उल हकने कोलकाता नाईट रायडर्सच्या 3 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्याने 4 षटकात 49 धावा दिल्या. याशिवाय रवी बिश्नोई, यश ठाकूर आणि युद्धवीर सिंग चरक यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.