नगर – करोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासोबत एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणाही खासदार डॉ. विखे यांनी केली.
डॉ. विखे म्हणाले “करोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून कोरोनाचे संकट रोखण्याचे उपाय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. दुसरीकडे कोरोना बाधीतांच्या उपायांकरीता पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वानी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहानाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था आणि सामान्य नागरीक पुढे आले आहेत. त्यात शक्य असलेल्या सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे.”
मतदारसंघात करोनाचे संकट निवारण्यासाठी आपण विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले आहेत. मतदारसंघातील जे नागरीक इतर ठिकाणी अडकले आहेत, त्यांना आहे त्या ठीकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले असल्याचेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.