न्हावरे/निमोणे -निमोणे (ता. शिरूर) येथे घाटकोपर (मुंबई) येथून कुटुंबासह आलेल्या एका 47 वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल सोमवारी (दि. 1) पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
घाटकोपर येथून दि. 27 मे रोजी संबंधित व्यक्ती पत्नी व मुलासह आपल्या मूळगावी निमोणे येथे आला होता. मात्र, त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील प्रमुखांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केले होते.
दरम्यान, शनिवारी (दि. 30) दुपारी क्वारंटाइन केलेल्या कुटुंबातील 47 वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला औंध येथील सरकारी रुग्णालयात हलवले होते. तेथे त्याची करोना तपासणी केली असता, त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे निमोणे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बाहेर गावांवरून आलेल्या व्यक्तीच गावाकडे करोना घेऊन येत आहेत व स्वतः करोनाच्या शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परंतु, करोना पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत क्वारंटाइन केलेल्या त्याच्या कुटुंबातील पत्नी व मुलगा यांचीही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, सोमवारी (दि. 1) तहसीलदार लैला शेख,पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात भेट देत सूचना केल्या. निमोणे गावातील नागरिकानी घाबरून जाण्याचे कारण नाही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, हात धुणे गर्दी करू, नये याची खबरदारी घ्यावी, असे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व सरपंच बेबीताई भालेकर यांनी सांगितले.