संगमनेरात करोनाचे संकट अधिकच गडद

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील करोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. रविवारी (दि.31) पुन्हा पाच रुग्णांची भर पडली आहे. कोल्हेवाडी रोड येथील दोन युवक, कौठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण, मुंबई येथून खळी पिंपरी येथील 27 वर्षीय तरुण, तर डिग्रस येथील 52 वर्षीय महिला, असे पाच करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या 46 वर पोहचली आहे. त्यामुळे तहसीलदार अमोल निकम यांनी घरातच बसा, विनाकारण बाहेर निघू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

संगमनेर शहर व तालुक्‍यात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी पुन्हा पाच रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कंटेन्मेट झोन असलेल्या कोल्हेवाडी रोड येथील 22 व 24 वर्षीय दोन युवक, तालुक्‍यातील कौठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण करोनाबाधित आढळले. तसेच खळी पिंपरी येथील 27 वर्षीय तरुण मुंबई येथून आल्याचे कळताच प्रशासनाने त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. परंतु दोन दिवसांपासून त्याला त्रास होत असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, डिग्रस येथील 52 वर्षीय महिला मुंबई येथून आल्यानंतर तिला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी तिला घरी सोडल्यानंतर तिला त्रास सुरु झाला. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याही महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासन शोध घेत असून, ज्या गावात रुग्ण सापडले, त्या गावाचा परिसर पूर्ण सील करण्यात येत आहे. प्रशासन युद्धपातळीवर संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत असून, तो परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तालुक्‍यात करोना बाधितांची संख्या 46 असून, त्यात मूळ संगमनेर येथील रहिवासी असलेल्या व्यक्तींची संख्या 34 आहे. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींची संख्या 12 आहे. आतापर्यंत 22 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.