सातारा – एका गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. अभिषेक आनंदराव डोळस असे पोलिस कॉन्स्टेबलचे तर अजय शिवाजीराव इनामदार असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मिसिंगचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील मिसिंग व्यक्तीच्या लग्नाला साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी डोळस याने लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून शनिवारी शाहूपुरी पोलिस स्टेशन परिसरात सापळा लावला होता. त्यानंतर डोळस याने इनामदार याच्या कार्यालयात पैसे देण्याचे तक्रारदार यांना सांगितल्याने एसीबीने प्रतापगंज पेठेत असलेल्या इनामदार याच्या कार्यालयाबाहेरच सापळा लावल्यानंतर इनामदार हा तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये स्विकारताना रंगेहात लाच लूचपतच्या जाळय़ात सापडला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इनामदार व डोळस या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला , सहा. फाैजदार आनंदराव सपकाळ, हवालदार भारत शिंदे, संजय साळुंखे, विनोद राजे, अमित कर्णे, प्रशांत ताटे, विशाल खरात, निलेश येवले , संभाजी काटकर, महिला पोलिस श्रध्दा माने, शितल सपकाळ यांनी केली.