बारामती, (प्रतिनिधी)- शहरातील खत्री पवार इस्टेटमध्ये शनिवारी (दि. 13) झालेल्या दाम्पत्याच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली. आर्थिक कारणातून ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिग्विजय गणेश झणझणे (वय 21, रा. खत्री पवार इस्टेट, जामदार रोड, बारामती), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. य प्रकरणी यश सचिन वाघोलीकर यांनी फिर्याद दिली. शनिवारी राहत्या घरात बांधकाम व्यावसायिक असलेले सचिन महालिंग वाघोलीकर (वय 48) व त्यांची पत्नी सारिका सचिन वाघोलीकर (वय 40) यांचा सकाळी साडेअकराच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आर्थिक कारणावरुन दिग्विजय गणेश झणझणे याने हा खून केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी पोलिसही या घटनेनंतर चक्रावले होते. मात्र, काही वेळातच पोलिसांनी हालचाली करुन दिग्विजय झणझणे याला ताब्यात घेतल्यानंतर दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा झाला.
सचिन वाघोलीकर यांनी दिग्विजय याच्याकडून पैसे घेतले होते व ते परत करण्यास ते टाळाटाळ करत होते, त्या रागाच्या भरात दिग्विजयने घरात असलेल्या पती पत्नीवर हल्ला करत त्यांचा निर्घृण खून केला अशी प्राथमिक तपासात माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी नमूद केले.
स्वताः पोलिस अधीक्षकच काल बारामतीत असल्याने या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने संशयित लगेचच ताब्यात आला. दिग्विजय हा ऑनलाईन ट्रेडींग करत असल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरिक्षक संतोष घोळवे करीत आहेत.