यवत -दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीतील मलभारेवस्ती येथे गुरुवारी (दि. 12) दुपारी बारामती क्राइम ब्रॅंचच्या पोलीस पथकाने अवैधपणे गुटख्याचा साठा असलेल्या ठिकाणी छापा टाकला.
गुटखा विक्रेता राजेंद्र गणपत मलभारे यांच्यावर कारवाई करीत 11 लाख 36 हजार रुपयांच्या गुटख्यासह 5 लाख रुपये किंमतीची पिकअप गाडी असा एकूण 16 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती क्राइम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना गोपनीय माहिती मिळाली की, राजेंद्र मलभारे हे यवत येथे गुटख्याचा साठा करून यवत आणि परिसरामध्ये गुटखा वितरण करीत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या पिकअप गाडीने वाहतूक करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस पथकाने माहिती घेऊन त्याठिकाणी बारामती क्राइम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामती क्राइम ब्रॅंचचे पोलीस जवान आणि यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासह छापा टाकला.
या छाप्यात विमल, महेक, आरएमडी, तुलसी नावाचा गुटख्याचा साठा मिळून आला. या गुटख्याची किंमत 11 लाख 36 हजार रुपये व जप्त केलेली पिकअप गाडी 5 लाख रुपयांची असा एकूण 16 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या करवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासन, पुणे यांना कळविले असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रॅंचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राइम ब्रॅंचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, रमेश केकान तसेच यवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमनाथ सुपेकर, नारायण जाधव यांनी सहभाग नोंदवला.