महापालिका : खेळाडूंना मिळणार विविध सोयीसुविधा
– संगीता पाचंगे
पिंपळे गुरव – येथील पवना नदीच्या किनारी निसर्गरम्य परिसरात सृष्टी चौकाजवळ महापालिकेकडून दीड एकर जागेत खेळाच्या मैदानाची निर्मिती करण्यात येत आहे. हा परिसर कित्येक वर्षांपासून पडीक होता. मोकळी जागा नियोजनाअभावी पडून होती. परंतु या जागेला नवसंजीवनी देण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मोकळ्या जागेचा चांगला उपयोग होण्यासाठी आणि परिसरातील लहानमुलांना, नागरिकांना सोयीचे होईल असे मैदान येथे निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक नगसेवक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महापालिका प्रशासन व राजकीय नेते यांचे विशेष लक्ष असल्याने या कामाने गती घेतली आहे. मार्च अखेर हे काम पूर्णत्वास येईल असे सांगण्यात येत आहे.
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक नेहमीच गजबजलेला असतो. येथे पवना नदीच्या किनारी दीड एकर जागेत खेळाचे मैदान साकारण्यात येत आहे. गेले अनेक दिवसांपासून हे काम जोमाने सुरू आहे. या उद्यानामुळे परिसरातील मुलांची खेळाच्या मैदानाची समस्या सुटणार आहे. त्यामुळे युवावर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहरातील प्रशस्त रस्ते, उद्याने यामुळे शहरातील रहिवाशांना चांगली सुविधा मिळत आहे. सृष्टी चौकात होणाऱ्या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यातच भव्यदिव्य असे खेळाचे मैदान होत असल्याने लहान मुलांचे, खेळाडूंचे हे आकर्षणाचे केंद्र बनत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग निर्माण होत आहेत. जागेचे भाव गगनाला भिडल्याने सोसायटीत, चाळीत मुलांना खेळण्यासाठी मैदान नव्हते. त्यामुळे मुलांची कुचंबणा होत होती. मुलांचा बौद्धिक विकास होत असला तरी शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यात मैदानी खेळाने मुले तंदुरुस्त बनतात. या सर्व गोष्टींसाठी परिसरात एखादेतरी मैदान असावे ही गरज ओळखून स्थानिक नगरसेवक व आमदार यांच्या प्रयत्नातून येथे उद्यान व मैदानाची निर्मिती होत आहे.
मैदानाची वैशिष्ट्ये
प्रशस्त रस्ते, फुलांची झाडे. हिरवा गालीचा, ऍक्युप्रेशर वॉक वे, आकर्षक कारंजे, आलेल्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, विविध खेळांची मैदाने एकाच ठिकाणी असणार आहेत.
पवना नदीच्या काठावर हे मैदान साकारले जात आहे. त्यामुळे परिसरातील मुलांची मैदानी खेळाच्या सरावाची सोय होणार आहे. यामुळे मुले अभ्यासाबरोबरच खेळ खेळू शकतात यातून मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास होऊ शकतो. मैदानाच्या प्रवेशद्वारावर खेळाडूंची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
– शशिकांत कदम, स्थानिक नगरसेवक
येत्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. या वर्षीची मुलांची उन्हाळा सुटी याच मैदानात जाईल. मुलांना खेळण्यासाठी व विविध खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी मदत व्हावी म्हणून महापालिकेकडून मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे.
– देवण्णा गट्टेवार, कार्यकारी अभियंता