पुणे – महापालिका शाळांमधील मुलांना खेळण्यासाठी मैदाने मिळत नसली तरी पालिकेचा पैसा खर्च करण्यासाठी मात्र, मैदानाचा सर्रास वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येरवडा येथील महापालिकेच्या शाळेचे एक मैदान पैसा खाणारे मैदान म्हणून समोर आले आहे.
गेल्या पाच वर्षात या मैदानावर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून 50 ते 60 लाख रूपयांची विकासकामे केल्यानंतर हे मैदान मुलांसाठी चांगले नसल्याचा साक्षात्कार झालेल्या महापालिकेच्या शिक्षण विभागाने मैदानाच्या दुरूस्तीसाठी आणखी एक कोटींचा खर्च करण्यास सुरूवात केली आहे.
या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वडगावशेरी विभागाच्या वतीने सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत या पैसे खाणाऱ्या मैदानाची माहिती दिली. तसेच, या मैदानावर आता पर्यंत झालेल्या सर्व खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली.
काय आहे प्रकार
येरवडा येथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये महापालिकेची शाळा क्रमांक 143 ( मुलांची), क्रिडानिकेतन, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक शाळा, शाळा क्रमांक 96 आणि अनुसया सावंत शाळा अशा सहा शाळा एकाच ठिकाणी भरतात.तर सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व शाळांसाठी एकच मैदान आहे. या मैदानाच्या विकासाकरीता क्षेत्रीय कार्यालयाने 2017 ते 2022 या कालावधीत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
हा खर्च करताना मैदान एक असले तरी प्रत्येक वेळी शाळेचे नाव बदलत खर्च करण्यात आला. तर आधी हे मैदान खो-खो साठी विकसित कारण्यात आले तर आता ते कब्बडीसाठी विकसित केले जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागाने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मैदान विकसाचे काम हाती घेतले गेले आहे. ऑक्टोबर महिन्यात हे काम थांबविण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर हे काम पुन्हा सुरु केले गेल्याचा आरोप पत्रकार परिषदेतकरण्यात आला आहे.