नारायणगाव उपबाजारात भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल
नारायणगाव – शेतकरी सुखी तर जग सुखी असे जरी म्हटले जात असले तरी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात धना, मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बाजार भाव मिळत नसल्याने नारायणगाव उपबाजारात शेतकऱ्यांवर धना मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे.
धना, मेथीची शनिवारी (दि. 29) 3 लाख 25 हजार 100 जुडा इतक्या मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यावेळी 100 जुड्यास धना 51 ते 1800 तर मेथी 101 ते 900 प्रमाणे भाव मिळाला. मुंबईला सतत सुरू असलेल्या पावसाने मालाची विक्री होत नाही. तर ग्रामीण भागातही धना मेथीला फारसा उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
धना मेथीला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नारायणगाव उपबाजारात दहा ट्रॅक्टर व पिकअप गाडीतून आणलेल्या जवळपास 70 ते 80 हजार धना मेथी जुडा फेकून दिला. अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ड. संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे आणि संचालक मंडळाने दिली.
माल चांगला असेल तरच काढा
शेतकऱ्यांना शेतातून धना, मेथीचा अडीच हजार जुडा काढायचा ठरला तर पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव शेतकऱ्याला सांगावे लागते की माल चांगला असेल तरच काढा अन्यथा काढू नका, अशी माहिती व्यापारी कमलाकर वाजगे यांनी दिली.
टोमॅटोची आवक घटली
नारायणगाव उपबाजारत टोमॅटोला 600 ते 2250 रुपये क्रेट इतका बाजार भाव मिळत आहे. मात्र आवक फक्त 8 हजार 750 क्रेट होती. म्हणजेच टोमॅटोला भाव मिळत असला तरी आवक घटलेली दिसून येते.
आपल्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे धना मेथीचे नुकसान झाले नाही. जास्तीत जास्त चांगला माल असल्याने आवक वाढली. मुंबईला पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धना, मेथी टिकत नाही. तसेच पदपथावर विक्रीसाठी माल देता येत नाही. तर स्थानिक संगमनेर, अहमदनगर बाजारपेठेतही धना, मेथीची आवक वाढली आहे.
– कमलाकर वाजगे, व्यापरी, नारायणगाव