हिंगोली – पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाचा रनिंग करत असताना मैदनावर कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगोली शहरात घडली. संघपाल नरवाडे (वय 23, वसमत) असे मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संघपालचे पोलीस होण्याचे स्वप्न होते. अभ्यासासाठी आणि मैदानी सरवासाठी तो हिंगोलीत राहत होता. आज सकाळी आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर धावण्याचा सराव करत असताना तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डाॅक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
अचानक घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.