एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं, तर दुसरीकडे अशोभनीय वक्तव्यही करायचं, कसा जमत असेल दुटप्पीपणा ?

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

मुंबई : राज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगेलच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमक होत आहे. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचे आणि दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर शरसंधान साधले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगली आहे. दरम्यान, नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना रुएली चाकणकर यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटील साहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन.” अशा शब्दात नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना चाकणकरांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्षपणे झापले.

राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. दरम्यान, महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. त्याला चाकणकरांनी उत्तर दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.