पुण्याच्या उपमहापौरपदी सुनीता वाडेकर

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन मतदान

पुणे – शहराच्या उपमहापौरपदी भाजप, रिपाइं आघाडीच्या उमेदवार सुनीता वाडेकर विजयी झाल्या. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांनी निवडणूक लढविली. वाडेकर यांना 97, तर राजगुरू यांना 61 मते मिळाली. निवडणुकीत मनसेचे नगरसेवक अनुपस्थित होते, तर एमआयएमच्या नगरसेविका अश्‍विनी लांडगे या तटस्थ राहिल्या.

महापालिकेत सत्ताधारी पक्ष असेलल्या भारतीय जनता पक्षाने पालिकेत मित्र पक्ष असलेल्या रिपाइंला उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रिपाइंच्या गटनेत्या वाडेकर यांना संधी देण्यात आली होती. मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने मतदान घेत निवडणूक पार पडली.

पालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असल्याने वाडेकर यांचा विजय निश्‍चित होता. मंगळवारी या निवडणुकीची औपचारिकता पार पडली. अप्पर जमाबंदी आयुक्‍त आनंद रायते यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. तर, प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी या निवडणुकीचे ऑनलाइन कामकाज पाहिजे. या निवडीनंतर वाडेकर यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी खासदार गिरीश बापट यांनी वाडेकर यांना पुष्पहार देऊन शुभेच्छा दिल्या. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपाइंचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर यांच्यासह रिपाइंचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.

पालिकेत मित्र पक्ष असलेल्या रिपाइंला उपमहापौर देण्याचा शब्द देण्यात आला होता. तो शब्द पाळत भाजपने सुनीता वाडेकर यांना ही संधी दिली आहे. सर्वांना एकत्र घेऊन काम करत पुढे जाणार आहोत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.