सातारा -खा. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या, दि. 24 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जलमंदिर येथून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.
वाढदिवसानिमित्त खा. उदयनराजे हे शुक्रवारी (दि. 24) सकाळी 8.30 वाजता जलमंदिर पॅलेस येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांकडून मानवंदना स्वीकारतील. जलमंदिर पॅलेस येथेच सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण, त्यानंतर महानुभाव मठात फळवाटप, 9.15 वाजता महासैनिक भवनच्या मागील बाजूस कातकरी वस्तीत (करंजे) खाऊवाटप, 9.30 वाजता मार्केट यार्ड येथील डीबी कदम मार्केटमध्ये सरबत वाटप, 10.15 वाजता रिमांड होममध्ये अन्नदान व शालेय वस्तू वाटप, 10.30 वाजता भिक्षेकरी ग्रहात अन्नदान, 10.45 वाजता कनिष्क मंगल कार्यालयाशेजारी रिक्षा स्टॉपचे उद्घाटन आणि 11 वाजता सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर 11.30 वाजता खावली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना अन्नदान, दुपारी 12 वाजता देगाव येथील माउली हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये भूमाता यूथ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला खा. उदयनराजे भेट देणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पारंपरिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भेट, 12.45 वाजता गोळीबार मैदान येथे एलईडी टीव्ही वाटप, 1 वाजता विलासपूर येथे वहीतुला, 1.30 वाजता वळसे येथील एहसास गतिमंद मुलांच्या शाळेत अन्नदान, 2 वाजता जकातवाडी आश्रमशाळेत आरोग्य तपासणी महाशिबिरास भेट, 2.15 वाजता राजवाडा येथे उसाच्या रसाचे वाटप, शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ऐतिहासिक देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण 2.30 वाजता जलमंदिर पॅलेस येथे होणार आहे.
सायंकाळी 5 वाजता राजवाडा येथे गांधी मैदानावर “रणांगण – मावळ्यांची शाळा’ हा कार्यक्रम होणार असून, 5.15 वाजता परळी येथे
बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी खा. उदयनराजे हे सायंकाळी 6 वाजता जलमंदिर पॅलेस येथे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खा. उदयनराजे मित्रसमूहाच्यावतीने करण्यात आले आहे.