न्यूयॉर्क – ओमायक्रॉन हा हंगामी सर्दी पडसे आणणारा विषाणू आहे. त्यापेक्षा जास्ती काहीही नाही. त्याचा बाऊ केल्यामुळे घबराट पसरते आहे, असे मत लॉस एंजेलिसमघील हृदयविकारतज्ज्ञ अफशिन इम्रानी यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी ट्वीटसच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ओमायक्रॉनच्या चाचण्यांवर भर देण्यापेक्षा देशांनी त्यांच्याकडील साधनसामग्रीचा वापर रुग्णांची मानसिक आणि आर्थिक मदत करण्यासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.
इम्रानी यांचे ट्विटरवर असंख्य फॉलोअर आहेत. ते करोना साथीच्या प्रारंभिक काळापासून ट्विटरवर मते मांडत आहेत. ते पुढे म्हणतात की, ओमायक्रॉन ही अशी लस आहे, जी लस उत्पादक कंपन्या बनवू शकल्या नाहीत. येत्या आठ ते 12 आठवड्यांत ही लस सर्वांना मिळालेली असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जगातील 80 टक्के लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होणारच असून, तो रोखण्यासाठी आपण फार काही करू शकणार नाही. मास्क, लशी यांनी काहीही फरक पडणार नाही. लस घेतलेल्यांचे मृत्यूचे किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी असेल हे नक्की,असेही त्यांनी म्हटले आहे.